Friday 17 July 2020

तुकाराम बोल्होबा आंबिलेच्या कवितेची गोष्ट...

तुकाराम बोल्होबा आंबिलेच्या कवितेची गोष्ट
----------------------------------------------

तुम्ही म्हणू शकता
कवीनं असू नये सुस्त आणि सुशेगाद.
तुम्ही म्हणू शकता
कवीनं करू नये कुणाशी जुगाड
तुम्ही म्हणू शकता
कवीनं गाळावी लाळ जीभ दाखवत.

तुम्हाला हवा असू शकतो कवी
फ्राय केलेल्या सुंगटासारखा
मऊ
आणि
लुसलुशीत
कोणताही काटा नसलेला.

तुम्ही उठवू शकता वादळ
कवीच्या शब्दांवरून
तुम्ही
शोध शकता कवीचे मूळ आणि कुळ
त्याला उभा करू शकता कोर्टात
तुम्ही देऊ शकता कवीला
आई बहिणीवरून गालिच्छ शिव्या
किंवा
नाकारू शकता कवीचा काव्यसंग्रह
एखादा शब्द अश्लील असल्याचा आळ घेऊन...


तुम्ही उठवू शकता कवीला
आयुष्यातून
किंवा
अर्ध्या ताटावरून
अथवा
 हाकलू शकता वरातीतून
पण
कवीला कवितेतून उठवता येत नाही
आठवून बघितला तर
 तुम्हाला
नाकारताच येणार नाही
तुकाराम आंबिलेच्या कवितेची गोष्ट.

- प्रा.डाॕ. जयप्रभू कांबळे (८८०६४७५९९३)

No comments:

Post a Comment